कर्जापोटी दिलेले धनादेश न वटल्याप्रकरणी बारामती येथील न्यायालयाने तीन महिन्यांची साधी कैद तसेच १३ लाख ४० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची शिक्षा सुनावली आहे. नुकसानभरपाईची रक्कम एका महिन्याच्या आत न दिल्यास पुन्हा तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.
या प्रकरणातील आरोपी स्वाती जयपाल चोपडे व डॉ. जयपाल जगन्नाथ चोपडे यांनी मुक्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, माळेगाव बु. यांच्याकडून प्रत्येकी ५ लाख रुपये, असे एकूण १० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज नोव्हेंबर २०२४ मध्ये घेतल्याचे न्यायालयीन कागदपत्रात नमूद आहे.
कर्जाची रक्कम मुदतीत परतफेड न झाल्याने संबंधित कर्ज थकीत झाले. त्यानंतर आरोपी स्वाती जयपाल चोपडे यांनी फिर्यादी पतसंस्थेला धनादेश दिला होता. मात्र, हा धनादेश न वटल्याने पतसंस्थेने आरोपींविरुद्ध निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्टच्या कलम १३८ अन्वये न्यायालयात खटला दाखल केला.
या खटल्यात फिर्यादी पतसंस्थेच्या वतीने सादर करण्यात आलेला साक्षीपुरावा तसेच कर्ज प्रकरणातील कागदपत्रांच्या आधारे आरोपींनी घेतलेले कर्ज थकीत असल्याचे सिद्ध झाले. फिर्यादी पक्षाच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली.
न्यायालयाने आरोपींना तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावत, फिर्यादी संस्थेस १३ लाख ४० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला आहे. सदर नुकसानभरपाईची रक्कम एका महिन्यात न दिल्यास आरोपींना पुन्हा तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.
या प्रकरणात फिर्यादी मुक्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने ॲड. सुनील वसेकर, ॲड. संदीप चव्हाण व ॲड. पंकज काटे यांनी कामकाज पाहिले.
©2026. All Rights Reserved.