माळेगाव पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत एका सराईत गुन्हेगारास अटक करून त्याच्याकडून दोन गावठी बनावटीचे पिस्टल, एक रायफल, दोन जिवंत काडतुसे तसेच दोन वापरलेल्या काडतुसांच्या पुंगळ्या असा शस्त्रसाठा जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. १३ जून) सांगवी (ता. बारामती) येथे करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र रंजनकुमार शर्मा यांनी पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार व बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले होते.
माळेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, अक्षय कल्याण तावरे (वय ३५, रा. वाघवस्ती, सांगवी, ता. बारामती) हा गावठी पिस्टल व जिवंत काडतुसांसह सांगवी परिसरात फिरत आहे.
या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने सांगवी गावात जाऊन शोध घेतला असता अक्षय तावरे हा कार्तिक हॉटेलसमोर खुर्चीवर बसलेला दिसून आला. पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला दोन गावठी पिस्टल, खिशात दोन जिवंत काडतुसे व दोन वापरलेल्या काडतुसांच्या पुंगळ्या आढळून आल्या.
यानंतर पोलिसांनी त्याच्या वाघवस्ती, सांगवी येथील राहत्या घराची पंचांसमक्ष झडती घेतली असता घराशेजारील गोठ्यात प्लास्टिकच्या ड्रममध्ये लपवून ठेवलेली एक रायफल मिळून आली.
तपासादरम्यान आरोपीने ही शस्त्रे मागील आठ महिन्यांपूर्वी मध्यप्रदेशातून आणल्याची माहिती दिली. तसेच दोन्ही गावठी पिस्टलची चाचणी करण्यासाठी शिरवली येथील नीरा नदी परिसरात फायर केल्याचे सांगितले.
याप्रकरणी अक्षय तावरे याच्याविरुद्ध माळेगाव पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला मंगळवार (दि. १६)☺️ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
अक्षय तावरे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पुणे ग्रामीण, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत मालमत्ता व मानवी शरीराविरुद्धचे एकूण २६ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने केली. पथकात पोलीस उपनिरीक्षक डी. आर. साळवे, तुषार भोर तसेच पोलीस कर्मचारी विजय वाघमोडे, राहुल पांढरे, अमोल राऊत, ज्ञानेश्वर मोरे, अमोल कोकरे, नंदकुमार गव्हाणे, अमोल वाघमारे व जयसिंग कचरे यांचा समावेश होता.
©2026. All Rights Reserved.