पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या डोक्यात लोखंडी हातोड्याने प्राणघातक वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीला बारामती येथील जिल्हा न्यायालयाने ७ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. आरोपी विलास दादा नेटके (रा. सहजपूर, ता. दौंड, जि. पुणे) याला भादंवि कलम ३०७ अन्वये ही शिक्षा सुनावण्यात आली.
मंगळवारी (दि. ४ ऑगस्ट) बारामती येथील मे. जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती एस. आर. पाटील यांनी हा निकाल दिला. न्यायालयाने आरोपीस १० हजार रुपये दंड तसेच दंडाची रक्कम न भरल्यास दोन महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली. तसेच भादंवि कलम ३२३ अन्वये ६ महिने कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीवर हल्ला
या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, १५ जुलै २०२० रोजी आरोपी विलास दादा नेटके याने पत्नी ललिता विलास नेटके हिच्या चारित्र्यावर संशय घेतला. याच कारणातून त्याने हातातील लोखंडी हातोड्याने ललिता यांच्या डोक्याच्या उजव्या बाजूस जोरदार प्रहार करून त्यांना गंभीर दुखापत केली. या हल्ल्यात त्यांचा जीव जाण्याची शक्यता निर्माण झाली होती.
या घटनेप्रकरणी आप्पा सुदाम सकट यांनी यवत पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध फिर्याद दाखल केली होती. तत्कालीन तपासी अधिकारी एन. एस. लकडे यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
नऊ साक्षीदारांच्या साक्षी ठरल्या महत्त्वाच्या
सदर खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण ९ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. यामध्ये जखमी ललिता नेटके, त्यांचा मुलगा सुमेश तसेच इतर साक्षीदार आणि तपासी अधिकाऱ्यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.
खटल्यादरम्यान डॉ. शलाका लोणकर यांची वैद्यकीय साक्ष आणि वैद्यकीय पुरावा महत्त्वाचा ठरला. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील सुनिल ईश्वर वसेकर यांनी प्रभावी युक्तिवाद केला. सरकार पक्षाचा युक्तिवाद, साक्षीदारांच्या साक्षी आणि वैद्यकीय पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी विलास नेटके याला दोषी ठरवत शिक्षा सुनावली.
पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान
सदर प्रकरणात यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी किशोर वागज यांनी केस अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांना पोलीस हवालदार वेणूनाद ढोपरे यांनी मोलाचे सहकार्य केले.
तसेच गोरख कसपटे, पोलीस उपनिरीक्षक आणि ए. जे. कबडे, सहायक फौजदार यांनी पैरवी अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या पतीला न्यायालयाने सुनावलेल्या या शिक्षेमुळे अशा गंभीर प्रकरणांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होण्यास मदत होणार आहे.
©2026. All Rights Reserved.