अवैध दारू वाहतुकीविरोधात माळेगाव पोलिसांनी धडक कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत देशी दारू, गावठी हातभट्टीची तयार दारू, मारुती सुझुकी अल्टो कार आणि मोटारसायकल असा एकूण ४ लाख ४६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
माळेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे व पोलीस अंमलदार हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. शेखर श्रीरंग पवार हा मोटारसायकलवरून गावठी हातभट्टीची तयार दारू घेऊन येणार असून ती कैलास शंकर गव्हाणे याला विक्रीसाठी देणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी कऱ्हावागज चौकात सापळा रचला. काही वेळाने संशयित मोटारसायकल तेथे आली. त्यानंतर माळेगावकडून मारुती सुझुकी अल्टो गाडी आली. मोटारसायकलवरील व्यक्तीने काळ्या रंगाचा ड्रम अल्टो कारमध्ये ठेवताना पोलिसांच्या निदर्शनास आले. संशय बळावल्याने पोलिसांनी तात्काळ दोन्ही व्यक्तींना ताब्यात घेतले.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे शेखर श्रीरंग पवार (वय २४, रा. राजापूर-दानेवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) आणि कैलास शंकर गव्हाणे (वय ३६, रा. माळेगाव बु., ता. बारामती, जि. पुणे) अशी आहेत.
झडतीदरम्यान पोलिसांना देशी दारूचे ३३ बॉक्स (१,१५,५००), गावठी हातभट्टीची तयार दारू असलेले ३० लिटर क्षमतेचे दोन काळे ड्रम (किंमत ६,०००), ३ लाखांची मारुती सुझुकी अल्टो कार आणि २५ हजारांची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण ४ लाख ४६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.
या प्रकरणी माळेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे करीत आहेत.
दरम्यान, आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दानेवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर येथे गावठी हातभट्टीची दारू तयार करणारी भट्टी शोधून ती उद्ध्वस्त केली.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे, पोलीस हवालदार विजय वाघमोडे तसेच पोलीस अंमलदार धीरज कांबळे, श्रीकांत माने, ज्ञानेश्वर मोरे, अमोल राऊत, अमोल वाघमारे, सागर पवार, जयसिंग कचरे, सागर गायकवाड आणि होमगार्ड रमजान डांगे यांच्या पथकाने केली.
©2026. All Rights Reserved.