वैवाहिक जीवनातील मतभेद टोकाला गेल्यानंतर न्यायालयीन लढाईपर्यंत पोहोचलेल्या एका प्रकरणाचा शेवट अखेर मध्यस्थीच्या माध्यमातून समाधानकारक पद्धतीने झाला. या प्रकरणात पत्नीला आयुष्यभराची पोटगी म्हणून साडेसतरा लाख रुपये व पाच तोळे सोने मिळाले असून, दोन्ही पक्षांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला आहे. विशेष म्हणजे, केवळ एका वर्षाच्या कालावधीत हे प्रकरण निकाली निघाल्याने दोन्ही कुटुंबांची दीर्घकालीन कोर्टकचेरी टळली.
या प्रकरणात पत्नीने पतीकडून फसवणूक झाल्याचा आरोप करत न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. तिला पोटगी तसेच तिचे दागिने परत मिळावेत, अशी भूमिका होती. त्यानुसार ॲड. सुप्रिया विशाल बर्गे यांनी संबंधित न्यायालयात पोटगीची केस दाखल केली. या प्रकरणात पतीसह त्याच्या कुटुंबातील तब्बल २३ जणांना न्यायालयात हजर राहावे लागले.
दोन्ही पक्षांच्या वकिलांनी सामाजिक जाणीव ठेवून संसार टिकविण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाबाहेर अनेक बैठका घेण्यात आल्या. मात्र, पती-पत्नी दोघेही एकत्र राहण्यास तयार नसल्याने अखेर घटस्फोटाच्या दिशेने प्रक्रिया पुढे गेली. पतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला, तर पत्नीने आयुष्यभराची पोटगी व दागिने मिळाल्यासच घटस्फोटास संमती देण्याची भूमिका घेतली.
यानंतर हे प्रकरण मध्यस्थीसाठी मे. भंडारी साहेबांकडे पाठविण्यात आले. मे. भंडारी साहेब यांनी दोन्ही पक्षांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत सलग सहा महिन्यांत आठ ते दहा बैठका घेतल्या. अनेक चर्चांनंतर अखेर दोन्ही पक्षांमध्ये समझोता झाला.
मध्यस्थी प्रक्रियेत ॲड. सुप्रिया विशाल बर्गे, ॲड. विशाल बर्गे तसेच समोरच्या पक्षाच्या वकिलांनी महत्त्वाची भूमिका बजावली. समोरच्या पक्षाच्या वकिलांनी प्रसिद्धीपासून दूर राहण्याची इच्छा व्यक्त केल्याने त्यांचे नाव जाहीर करण्यात आले नाही.
दोघांचे लग्न कुटुंबियांच्या संमतीने आणि सर्व पारंपरिक प्रक्रिया पूर्ण करून झाले होते. दोघेही सुशिक्षित व सुस्वभावी असतानाही सुरुवातीच्या काळातील मतभेद, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि परिस्थितीमुळे संसार टिकू शकला नाही. त्यातच मुलाच्या वडिलांना कॅन्सरसारखा गंभीर आजार झाल्याने पतीला कुटुंबीयांची जबाबदारी सांभाळताना पत्नीला पुरेसा वेळ देता आला नाही. दुसरीकडे, नव्याने संसारात आलेल्या पत्नीवरही अनेक जबाबदाऱ्या पडल्याने तणाव वाढत गेला.
या संदर्भात मे. भंडारी साहेब यांनी, “स्वतःच्या विचारांशी जुळणारा जोडीदार निवडावा. संसारात संयम, सहकार्य, शांतता आणि समजूतदारपणा दोघांकडेही असणे अत्यंत आवश्यक आहे,” असा सल्ला दिला.
या यशस्वी मध्यस्थीमुळे दोन्ही पक्षांना नव्याने आयुष्य सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, दीर्घकालीन न्यायालयीन संघर्ष टळल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.