आठ वर्षांपूर्वी दाखल झालेल्या धनादेश न वटल्याच्या (चेक बाऊन्स) प्रकरणात सर्व पुरावे पूर्ण झाल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांत निकाल देत बारामती येथील दिवाणी न्यायालयाने आरोपीस तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा तसेच धनादेशाच्या दुप्पट रक्कम नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत.
श्रीराम सिटी फायनान्स कंपनी लिमिटेडच्या बारामती शाखेने दाखल केलेल्या खटल्यामध्ये आरोपी श्रीराम सुरेश पागळे (मु. पो. पागळे वस्ती, ता. इंदापूर, जि. पुणे) यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. सदर प्रकरणाचा निकाल दिवाणी न्यायाधीश प्रितेश भंडारी यांनी दिला.
आरोपीने सन २०१६ मध्ये श्रीराम सिटी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. मात्र वेळेत कर्जाची परतफेड न केल्याने ते कर्ज थकित झाले. थकबाकीपोटी आरोपीने कंपनीला दिलेला धनादेश बँकेत सादर केल्यानंतर न वटता परत आला. त्यामुळे कंपनीने निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्ट १८८१, कलम १३८ अन्वये सन २०१७ मध्ये न्यायालयात खटला दाखल केला होता.
खटल्याच्या सुनावणीदरम्यान फिर्यादी पक्षाकडून सादर करण्यात आलेले साक्षीपुरावे, कागदपत्रे तसेच आरोपीने कर्ज घेतले असून ते थकित असल्याचे स्पष्टपणे सिद्ध झाल्याने न्यायालयाने फिर्यादी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरला. त्यानुसार आरोपीस तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली असून, फिर्यादी कंपनीला धनादेशाच्या दुप्पट रक्कम नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सदर रक्कम अदा न केल्यास आरोपीस अतिरिक्त पंधरा दिवसांचा साधा कारावास भोगावा लागणार आहे.
या प्रकरणात फिर्यादी श्रीराम सिटी फायनान्स कंपनी लिमिटेडच्या बारामती शाखेच्यावतीने अॅड. सुनील वसेकर, अॅड. संदीप चव्हाण आणि अॅड. पंकज काटे - देशमुख यांनी प्रभावीपणे कामकाज पाहिले.
©2026. All Rights Reserved.