भिगवण रोडवरील वृंदावन हॉटेलसमोर केवळ वाहन पार्किंगच्या क्षुल्लक कारणावरून तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची खळबळजनक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार तन्मेष सुधीर साळुंखे याला बारामती तालुका पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दि. २९ नोव्हेंबर रोजी मानस दीपक पाटील (रा. तानाईनगर, बारामती) हे आपल्या मित्रांसह जेवणासाठी वृंदावन हॉटेलमध्ये गेले होते. हॉटेलच्या बाहेर वाहन पार्किंगवरून झालेल्या वादाचे रूपांतर अचानक हिंसक हल्ल्यात झाले. आरोपी तन्मेष साळुंखे, राम लोखंडे, माउली रणदिवे, ओंकार भोसले व त्यांच्या ११ ते १२ साथीदारांनी मानस पाटील यांच्यावर दगड व लोखंडी गजाने डोक्यावर वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या मित्रांनाही पिकअप वाहनातून पाठलाग करून बेदम मारहाण करण्यात आली.
या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात विविध गंभीर कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यापूर्वी आरोपी राम अनिल लोखंडे (वय २४) याला अटक करण्यात आली होती. फरार आरोपींचा शोध सुरू असतानाच अखेर मुख्य आरोपी तन्मेष साळुंखे याला मंगळवारी (दि. १३ जानेवारी) अटक करण्यात पोलिसांना यश आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील, हवालदार मनोज पवार, सागर देशमाने, भारती खंडागळे तसेच पोलीस अंमलदार राजू बन्ने व दादा दराडे सहभागी होते. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील व पोलीस अंमलदार राजू बन्ने करीत आहेत.
"बारामती तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला आहे."
©2026. All Rights Reserved.