बारामती नगरपालिकेच्या नगर विकास विभागातील (टी.पी.) कामकाजावर नगरसेवक सुनील सस्ते यांनी गंभीर आरोप करत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बी.पी.एम.एस. प्रणालीद्वारे सुरू असलेल्या बांधकाम व नगररचना संबंधित फाईली “मीटर” पडल्याशिवाय पुढे सरकत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर फाईल जाण्यास तब्बल दीड महिना म्हणजेच ४७ दिवस लागत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
नगरसेवक सस्ते यांनी म्हटले आहे की, नगरविकास विभाग हा पूर्णपणे तांत्रिक स्वरूपाचा असून बांधकाम क्षेत्रातील जाणकार अधिकाऱ्यांशी संबंधित आहे. मात्र काही राजकीय व आर्थिक स्वार्थासाठी मुख्याधिकाऱ्यांच्या सह्याही “मीटर”च्या सोयीसाठी वापरल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. “साईट बंद आहे” यासारखी तुटपुंजी कारणे देऊन नागरिकांची पिळवणूक केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
यासोबतच आर्किटेक्टशी संबंधित आणि ठराविक व्यक्तींमार्फतच विभागातील कामे होत असल्याचा आरोप करत, सर्वसामान्य नागरिकांसाठी येथे काम करणे जवळपास अशक्य बनल्याचे त्यांनी सांगितले. मागील २० वर्षांपासून काही लिपिकांच्या बदल्या झालेल्या नसल्याचा दावा करत, काही आर्किटेक्टांकडून महागडे मोबाईल फोन भेट स्वरूपात दिले जात असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
विशेष म्हणजे विभागातील कामकाज संध्याकाळी साडेपाचनंतर सुरू होते, तसेच अभियंते व लिपिकांच्या बैठका खाजगी पंचतारांकित हॉटेल्स व जिममध्ये रात्री घेतल्या जात असल्याचा दावा त्यांनी केला. बारामती पालिकेत सध्या अधिकृत नगररचनाकार (Town Planner) नसल्याची बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली.
यापूर्वी एका नगररचनाकाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडून निलंबित केले होते, मात्र त्यानंतरही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
जमिनींवर हेतुपुरस्सर किंवा आर्थिक तडजोडीतून आरक्षणे टाकली जात असल्याचा आरोप करत, मागील १० ते १५ वर्षांतील आरक्षणांबाबत जमीनमालकांनी स्वतः पालिकेत जाऊन संबंधित ठराव, सूचकांची नावे, बैठकीचे प्रोसिडिंग व सदस्य उपस्थिती तपासून पाहावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. काही ठरावांमध्ये बैठकीला अनुपस्थित सदस्यांची नावे टाकण्यात आल्याचे प्रकार उघड झाल्याचा दावाही त्यांनी केला.
“स्वर्गीय अजितदादांच्या नावाखाली काही मलिदा गँगने चुकीच्या गोष्टी केल्या असल्याचे निदर्शनास येत आहे. बारामतीकरांनी आपल्या आरक्षणांबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे,” असेही सस्ते यांनी म्हटले आहे. यासंदर्भात अडचण असल्यास नागरिकांनी ९३२५०१९११९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन नगरसेवक सुनील सस्ते यांनी केले आहे.
©2026. All Rights Reserved.