बारामती पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अपेक्षेप्रमाणे पणदरे गणातील किरण रावसाहेब तावरे यांची, तर उपसभापतिपदी गुणवडी गणातील शुभांगी सुनील आगवणे यांची निवड करण्यात आली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार पक्षाने या दोघांवर विश्वास दाखवत त्यांना नेतृत्वाची संधी दिली.
सोमवारी (दि. ९) पंचायत समितीच्या सभागृहात सभापती व उपसभापती निवडीसाठी सदस्यांची विशेष बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून किरण तावरे व शुभांगी आगवणे यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. त्यानंतर दोघांनी आपले अर्ज दाखल केले आणि त्यांची निवड निश्चित झाली.
या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर, तालुकाध्यक्ष संदीप बांदल, युवकाध्यक्ष ज्ञानेश्वर पोमणे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बारामती पंचायत समितीत एकूण १२ सदस्यांपैकी १० सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे असून केवळ दोन सदस्य भाजपचे आहेत. त्यामुळे पंचायत समितीवर राष्ट्रवादीचे स्पष्ट बहुमत आहे.
सभापतिपदासाठी सुरुवातीच्या टप्प्यात अनुभवी नेतृत्वाला संधी देण्याचा पक्षाचा विचार होता. त्यानुसार किरण तावरे यांचे नाव सुरुवातीपासूनच चर्चेत होते. त्यांनी यापूर्वी राष्ट्रवादीच्या युवकाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली असून तालुक्यात त्यांचा चांगला जनसंपर्क असल्याचे मानले जाते.
निवड झाल्यानंतर किरण तावरे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार तसेच जय पवार यांचे संधी दिल्याबद्दल आभार मानले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विचारांचा वारसा जपत बारामती तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
©2026. All Rights Reserved.