उजनी धरणातून भीमा नदीपात्रात शनिवार (दि. १८) पासून पाणी सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नदीकाठच्या गावांसाठी तसेच पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांसाठी आणि जनावरांच्या पाण्याच्या गरजा भागवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. १६) झालेल्या बैठकीत उजनी धरणातून भीमा नदीत दोन टप्प्यांत एकूण ७ टीएमसी पाणी सोडण्यासाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्याची परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहनही हर्षवर्धन पाटील यांनी केले.
या बैठकीला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, सोलापूर जिल्हाधिकारी तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी ऑनलाइन उपस्थित होते.
सध्या उजनी धरणात सुमारे ८० टीएमसी पाणी साठा असून, हा साठा मागील वर्षाच्या तुलनेत २० टीएमसीने अधिक आहे. दरम्यान, जून महिन्यात पुन्हा पाणी सोडण्याबाबत मे महिन्यात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.
इंदापूर व माढा तालुक्यातील भीमा नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी आठ दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांची भेट घेऊन पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
©2026. All Rights Reserved.