डिजिटल युगात सायबर सुरक्षेबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने क्विक हील फाऊंडेशन आणि विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांची क्लब ऑफिसर्स म्हणून निवड करण्यात आली आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अध्यक्षपदी (President) प्रतिक मरळ, सचिवपदी (Secretary) विनया लाखे, क्रियाकलाप संचालकपदी (Activity Director) अस्मिता एकाड तर माध्यम संचालकपदी (Media Director) पूर्वा चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे विद्यार्थी सायबर सुरक्षेविषयी जनजागृती, प्रशिक्षण आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजात डिजिटल सुरक्षिततेचा संदेश पोहोचविण्याचे कार्य करणार आहेत.
या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी पुणे येथील क्विक हील फाऊंडेशनमध्ये विशेष प्रशिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षणादरम्यान सायबर सुरक्षा, ऑनलाइन फसवणूक प्रतिबंध, डिजिटल गोपनीयता, जबाबदार इंटरनेट वापर तसेच सायबर गुन्ह्यांपासून बचाव यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर तज्ज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी क्विक हील फाऊंडेशनच्या अध्यक्षा अनुपमा काटकर, अजय शिर्के, दिपू सिंग आणि गायत्री केसकर यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा, सोशल मीडिया सुरक्षा, ऑनलाइन फसवणूक टाळण्याचे उपाय, डिजिटल गोपनीयतेचे महत्त्व आणि उदयोन्मुख सायबर धोक्यांविषयी माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना सायबर जनजागृती उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्य प्राप्त झाले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शिक्षक समन्वयक प्रा. अक्षय भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत या उपक्रमाच्या माध्यमातून समाजात सायबर सुरक्षेविषयी व्यापक जनजागृती निर्माण करण्याचे आवाहन केले.
सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता तरुणांमध्ये डिजिटल सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असून, विद्या प्रतिष्ठानचे विद्यार्थी आता सायबर सुरक्षा जनजागृतीचे युवा दूत म्हणून कार्यरत राहणार आहेत.
©2026. All Rights Reserved.