हेन्केल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने ग्लोबल मिशन ॲस्ट्रॉनॉमी, इंडिया यांच्या सहकार्याने बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ‘डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
ॲस्ट्रॉनॉमी लॅबोरेटरी’ सुरू केली आहे. हेन्केल इंडियाच्या CSR उपक्रमांतर्गत उभारण्यात आलेल्या या खगोलशास्त्र व अंतराळ निरीक्षण केंद्राचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
यावेळी हेन्केल इंडियाचे वरिष्ठ व्यवस्थापक डॉ. प्रसाद खंडागळे, फेलो ऑफ रॉयल ॲस्ट्रॉनॉमी सोसायटी लंडनचे डॉ. विशाल कुंभार, विनायक पाटील, कीर्तिकुमार काटकर, मयूर झगडे, सुरेंद्र पवार व मंदार भोमे उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. प्रसाद खंडागळे म्हणाले, “हेन्केल इंडियाचा हा CSR उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच खगोलशास्त्र, अंतराळ निरीक्षण आणि अवकाश संशोधनाविषयी आवड निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. या माध्यमातून भविष्यातील वैज्ञानिक व खगोलशास्त्रज्ञ घडण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होईल.”
हेन्केल इंडियाने पुणे जिल्ह्यात यापूर्वी १५ ठिकाणी खगोलशास्त्र विषयाच्या प्रयोगशाळा उभारल्या असून, विद्या प्रतिष्ठानमधील ही १६ वी प्रयोगशाळा आहे. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयासाठी उभारण्यात आलेली ही पहिलीच प्रयोगशाळा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लघुग्रह (Asteroids), विविध ग्रह, तारे तसेच अन्य खगोलीय घटकांचा अभ्यास आणि निरीक्षण करण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये विश्वाविषयी जिज्ञासा निर्माण करून संशोधनात्मक दृष्टिकोन विकसित करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
या CSR उपक्रमांतर्गत ‘ट्रेन द ट्रेनर’ कार्यक्रमाद्वारे पुणे जिल्ह्यातील ५०० हून अधिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच सुमारे १० हजार विद्यार्थ्यांना अवकाश संशोधनाशी जोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हेन्केल इंडियाने जगातील विविध देशांतील तसेच ISRO आणि NASA सारख्या नामांकित संस्थांशी सहकार्य केले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी या केंद्रामुळे बारामती परिसरातील विद्यार्थ्यांना ग्रहणे, ग्रह, तारे, लघुग्रह आणि विविध खगोलीय घटकांचे प्रत्यक्ष निरीक्षण व अभ्यास करण्याची संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. भौतिकशास्त्र विभागाच्या विविध शैक्षणिक व संशोधनात्मक उपक्रमांना या केंद्रामुळे मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी उपप्राचार्य डॉ. प्रदीप पाटील, विभागप्रमुख डॉ. जयश्री बागवडे, डॉ. देवकाते, डॉ. वेदपाठक यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
©2026. All Rights Reserved.