कृषी क्षेत्रातील जनजागृती, कृषी प्रसार आणि शेतकऱ्यांच्या यशोगाथा समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचविल्याबद्दल बारामतीतील युवा पत्रकार योगेश नालंदे यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार' प्रदान करण्यात आला. कृषी दिनानिमित्त १ जुलै रोजी मुंबई येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात राज्यपाल जीष्णू देव वर्मा यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, भरतशेठ गोगावले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
योगेश नालंदे यांनी अवघ्या एका वर्षात राज्यातील तब्बल ३६५ प्रगतिशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा शोधून वृत्तपत्रांच्या माध्यमातून प्रसिद्ध केल्या. या यशोगाथांमुळे हजारो शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली असून आधुनिक व सकारात्मक शेतीचा संदेश राज्यभर पोहोचविण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.
याशिवाय कृषी वाहिनीवर कार्यरत असताना त्यांनी बाजारभाव, हवामान अंदाज तसेच शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती नाट्यरूपांतरित ऑडिओच्या माध्यमातून तयार करून रेडिओवर प्रसारित केली. डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करत कृषी विभागाच्या योजनांची माहिती अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. तसेच 'शेतकरी योद्धा' या कृषीविषयक वृत्तपत्राचीही त्यांनी सुरुवात केली असून त्यातून शेती क्षेत्रातील उपयुक्त माहिती सातत्याने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविली जात आहे.
दरम्यान, कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करताना राज्य शासन शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून सातत्याने कार्यरत असून भविष्यातही शेती व शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही दिली.
©2026. All Rights Reserved.