इंदापूर तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना, रमाई आवास घरकुल योजना आणि यशवंत घरकुल योजना अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर मंजूर झालेल्या अनेक घरकुलांची कामे अद्याप सुरू झालेली नसल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत गंभीर दखल घेत इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी संबंधित लाभार्थ्यांना तातडीचा इशारा दिला आहे.
मंजूर घरकुलाची कामे त्वरित सुरू करून दिलेल्या मुदतीत पूर्ण करावीत. अन्यथा पंधरा दिवसांत घरकुलाचे काम सुरू न केल्यास संबंधित लाभार्थ्यांचे मंजूर घरकुल रद्द करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा गटविकास अधिकारी खुडे यांनी दिला आहे.
दरम्यान, शुक्रवार (दि. ९) रोजी शेळगाव (ता. इंदापूर) येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सुरू असलेल्या विविध योजनांतील घरकुल कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी ग्रामपंचायत अधिकारी चंद्रकांत जगताप यांच्या समवेत मोटारसायकलवरून वाड्या-वस्त्यांवर प्रवास करत सुमारे ९० घरांना भेटी देऊन घरकुलांच्या सद्यस्थितीची तपासणी केली.
शेळगाव ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सक्रिय सहभाग नोंदवला असून या अभियानात घरकुल योजनेसाठी एकूण आठ गुण आहेत. हे गुण मिळवण्यासाठी ३१ मार्च २०२६ पूर्वी गावातील शंभर टक्के घरकुलांची कामे पूर्ण करणे आवश्यक आहे, असे आवाहन ग्रामपंचायत अधिकारी चंद्रकांत जगताप यांनी लाभार्थ्यांना केले आहे.
घरकुल योजनांच्या अंमलबजावणीस गती देण्यासाठी प्रशासनाने थेट शेत-शिवारात जाऊन केलेली ही पाहणी लाभार्थ्यांसाठी इशाराच मानली जात असून, आता घरकुलांची कामे वेगाने सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
©2026. All Rights Reserved.