विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला, नावीन्यपूर्ण कल्पनांना आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय ‘आविष्कार’ संशोधन प्रकल्प स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी ३८० हून अधिक संशोधन प्रकल्प सादर करून आपल्या कल्पकतेचे आणि संशोधनक्षमतेचे प्रभावी दर्शन घडविले.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य तथा आविष्कार संशोधन समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आविष्कार संशोधन प्रकल्पाच्या जिल्हा समन्वयक डॉ. शुभांगी शिंदे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करून त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध असून, संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आल्याचे डॉ. वायदंडे यांनी सांगितले.
डॉ. शुभांगी शिंदे यांनी प्रकल्पांचे मूल्यमापन करताना नावीन्य, वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनपद्धती, व्यवहार्यता आणि सामाजिक उपयुक्तता या निकषांना महत्त्व देण्याचे आवाहन परीक्षकांना केले. गुणवत्तापूर्ण संशोधन प्रकल्पांना योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाल्यास विद्यार्थ्यांना पुढील स्तरावर संशोधन करण्याची संधी मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी विद्यार्थ्यांनी संशोधन प्रकल्प केवळ स्पर्धेपुरते मर्यादित न ठेवता त्यांचे रूपांतर उपयुक्त संशोधन, पेटंट आणि स्टार्टअपमध्ये करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी स्थानिक समस्या ओळखून वैज्ञानिक पद्धतीने त्यांवर उपाय शोधावेत आणि संशोधनाचा उपयोग समाजाच्या प्रगतीसाठी करावा, असेही त्यांनी सांगितले.
या स्पर्धेचे आयोजन दोन महाविद्यालयांमध्ये करण्यात आले. विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे २०० हून अधिक, तर विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय येथे १६० हून अधिक प्रकल्प सादर करण्यात आले. पर्यावरण संवर्धन, संसाधनांचा प्रभावी वापर, समाजोपयोगी तंत्रज्ञान आणि स्थानिक समस्यांवरील उपाययोजना अशा विविध विषयांवरील प्रकल्पांनी स्पर्धेत वैविध्य निर्माण केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैक्षणिक संशोधन समन्वयक डॉ. जयश्री बागवडे यांनी केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. प्रदीप पाटील, डॉ. भीमराव मोरे, प्रा. निलिमा पेंढारकर तसेच विद्यापीठाने नियुक्त केलेले परीक्षक उपस्थित होते. डॉ. तुषार बोरसे यांनी आभार मानले.
स्पर्धेच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील शिक्षक, विभागप्रमुख, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या संशोधनक्षमतेला दिशा देणारी आणि नवोन्मेष, उद्योजकता व समाजोपयोगी संशोधनाला प्रोत्साहन देणारी ही स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरली.
©2026. All Rights Reserved.