बारामती येथील विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आणि क्विक हील फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणाऱ्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या उपक्रमांतर्गत, बारामती येथे विविध ठिकाणी सायबर सुरक्षेविषयी जनजागृती केली जात आहे. याच उपक्रमाच्या निमित्ताने पूर्वा चव्हाण आणि संपदा खैरे या विद्यार्थिनींनी बारामती टेक्सटाईल पार्कमधील पर्पल कंपनीतील महिला कामगारांना सायबर सुरक्षेचे महत्त्व पटवून देत मार्गदर्शन केले.
महिलांवर सोशल मीडियावरून होणाऱ्या फसवणूक, बनावट लिंक, फसवे कॉल्स, ओळखीच्या नावाने येणारे स्कॅम मेसेजेस या बाबतीत विशेष लक्ष देण्याची गरज आहे, याबाबतच्या जनजागृतीवर विशेष भर देण्यात आला. महिला कामगारांसाठी मार्गदर्शनात प्रामुख्याने सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती (जसे की फोटो, लोकेशन) शेअर करताना आवश्यक ती काळजी घेणे. अज्ञात कॉल्स किंवा लिंकद्वारे होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहणे. मोबाईल फोनमध्ये अँटीव्हायरस आणि सिक्युरिटी अँप्स वापरणे. ऑनलाइन पेमेंट करताना सुरक्षित अॅप्सचाच वापर करणे. सायबर फसवणूक झाल्यास तक्रार करण्याचे अधिकृत मार्ग याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान संवादात्मक पद्धतीने महिलांना प्रश्न विचारून, उदाहरणे देऊन सायबर सुरक्षेचे प्रात्यक्षिक स्वरूपात प्रशिक्षण देण्यात आले. महिलांच्या शंकांचे निराकरण देखील यावेळी करण्यात आल्याने कार्यक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
©2026. All Rights Reserved.