नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याकडून हंगाम 2024-25 मध्ये गाळप झालेल्या ऊसासाठी दिवाळीपूर्वी प्रति टन ₹100 प्रमाणे ऊस बिलाचा हप्ता 10 ऑक्टोबरपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. येत्या हंगामात ७ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, कारखान्याची 27 वी वार्षिक सभा शहाजीनगर येथील भाग्यरत्न सांस्कृतिक भवनमध्ये उत्साहात पार पडली.
सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील होत्या. त्यांनी स्पष्ट केले की, नीरा-भीमा कारखान्याचा 2025-26 चा गळीत हंगाम हा रौप्यमहोत्सवी हंगाम असून, उसाचे पेमेंट वेळेवर व ऊस दर स्पर्धात्मक ठेवण्याची ग्वाही दिली.
कारखान्याचे संस्थापक व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, कारखान्याची स्थावर मालमत्ता आता ₹547 कोटीपर्यंत पोहोचली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्ज न दिल्याने पेमेंट व पगारात उशीर झाला असला तरी येणाऱ्या हंगामात अशी अडचण येऊ देणार नाही. तसेच, शेतकऱ्यांच्या कर्जाची रक्कम ऊस बिलातून कपात केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी खोडवा ऊसाला प्रति टन ₹50 अनुदान, तसेच 86032 वाणाच्या लागणीस ₹30 अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली. ऊस तोडणी वाहतूक करणाऱ्यांना व उत्कृष्ट शेतकऱ्यांना पुरस्कार देण्याची योजनाही जाहीर झाली.
नीरा-भीमा कारखान्याच्या माध्यमातून आगामी काळात बायो-सीएनजी प्रकल्प व ए.आय. तंत्रज्ञानावर आधारित हवामान केंद्र उभारले जाणार असून, राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या माध्यमातून साखरेचा एम.एस.पी. ₹40 प्रति किलो करण्यासाठी व 25 लाख मे.टन साखर निर्यातीसाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
©2026. All Rights Reserved.